मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधात 5 जुलै रोजी गिरगांव चौपाटी ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्याचा एल्गार केलाय. या मोर्च्यात कुठल्याही पक्षाचा झेंडा नसणार आहे त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्या माणसाने या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन राज ठाकरे यांच्याद्वारा करण्यात आले होते. यासोबतच सर्व राजकीय पक्ष, साहित्यिक, बुद्धिजीवी यांना देखील मोर्चाचे निमंत्रण देण्यात येणार असून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती मध्ये 7 जुलै रोजी मराठी समन्वय समितीच्या एल्गारची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे एकच मागणीसाठी दोन मोर्चे अशी चर्चा रंगत असतानाच आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असे म्हणत राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असून 5 जुलै रोजी हे ऐतिहासिक राजकीय क्षण महाराष्ट्रातील जनतेला पहायला मिळणार आहेत.
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीची ही नांदी असून ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर या मोर्चाला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील राजकीय गणित मांडणे देखील सोप्पे जाणार आहे. एकूणच निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला हिंदी सक्ती विरोधाच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ग्रीप पकडला असून याला वाढता पाठिंबा आणि उद्धव ठाकरे यांची साथ लाभल्यास दोन्ही ठाकरे बंधू राज्य सरकारला जेरीस आणल्याशिवाय राहणार नाहीत आणि याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा लाभ दोन्ही ठाकरे बंधूना होईल यात शंका नाही.