पतंजलीच्या बनावट वेबसाईटद्वारे उपचाराच्या बहाण्याने माजी आमदार पुत्राची लाखोंची फसवणूक.
पतंजली या आयुर्वेदीक कंपनीच्या नावाने बनावट वेबसाईट बनवत माजी आमदार पुत्राची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतून समोर आली आहे. माजी आमदार रमेश पाटील यांच्या आजारपणाची माहिती त्यांचे सुपुत्र चेतन पाटील यांनी पतंजलीच्या बनावट वेबसाईटवर भरली असता त्यांना मिश्रा नामक एका इसमाचा फोन आला. यावेळी सदर व्यक्तीने मोठ्या चलाखीने विविध आजारांच्या वेगवेगळ्या पॅकेजची माहिती देत चेतन पाटील यांचा विश्वास संपादित केला.
दरम्यान पतंजली या आयुर्वेदिक कंपनी मार्फत आपले वडील रमेश पाटील यांच्यावर उपचार करण्यासाठी एकूण 7 लाख 25 हजार 330 रुपये भरण्यास मिश्रा नामक व्यक्तीने भाग पाडले. चेतन पाटील यांनी पैसे भरूनही उपचार होत नाही, नंतर कुठलाही संपर्क साधण्यात आला नाही यावरून आपली फसवणूक झाल्याचे चेतन पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ रबाळे पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी बनावट पतंजलीचे वेबपेज चालक असलेल्या मिश्रा नामक इसमा विरोधात विरोधात आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.