Sunday, September 7, 2025
Homeमहाराष्ट्रविमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा मार्ग खडतर, भूमिपुत्रांनो वेळ बंड...

विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा मार्ग खडतर, भूमिपुत्रांनो वेळ बंड करण्याची थंड बसण्याची नाही.

विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा मार्ग खडतर, भूमिपुत्रांनो वेळ बंड करण्याची थंड बसण्याची नाही

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव मिळावं यासाठी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्थ आग्रही आहेत. महाविकास आघाडीच्या काळात विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव सिडकोने राज्य सरकारकडे पाठवल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता. अनेक आंदोलने आणि या आंदोलनाला भूमिपुत्रांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे सिडको आणि राज्य सरकारला नमत घ्यावंच लागल. राज्य सरकारने विधिमंडळात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव मिळावं असा प्रस्ताव मंजूर करुन केंद्र सरकारकडे पाठवलाय. हे सगळं होऊन आता 2 वर्षं उलटलीत. विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव मिळणार म्हणून भूमिपूत्रांनी विमानतळाच्या कामात कुठेही बाधा आणली नाही उलट सहकार्यच केले. आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास आले असून कधीही उदघाटनाची तारीख जाहीर होऊ शकते. मात्र असे असले तरी केंद्र सरकारने अद्यापही दि बा पाटील यांच्या नावाची घोषणा केलेली नाही. जिथे देशात अनेक विमानतळाचे नाव उदघाटन होण्याच्या आधीच जाहीर करण्यात येते तिथे चार जिल्ह्यातील भूमिपुत्रांची मागणी असताना येथील भूमिपूत्रांचा सरकार वर विश्वास असताना अद्याप नाव जाहीर केलं न जाणे ही चिंतेची बाब आहे. गोड आश्वासनांनी आनंदी होणाऱ्या कृती समिती मधील नेते आणि भूमिपुत्राला जाग करण्याची वेळ आलेय.

*मुख्यमंत्री आणि सर्वपक्षीय कृती समिती भेट*

काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय कृती समितीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत पुन्हा एकदा नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव घोषित करण्यात यावं या मागणीचे निवेदन देण्यात आले. या भेटीत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जात असले तरी मुख्यमंत्र्यांनी कुठलही सकारात्मक उत्तर यावेळी दिलं नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय. त्यामुळे भूमिपुत्रांनो सावधान होण्याची आवश्यकता आहे.

*दिबांच्या नावाने निघालेली वाहन रॅली*

एकच धून 24 जुन म्हणत दि. बा. पाटील यांच्या 12व्या स्मृतीदीनानिमित्त भूमिपुत्रांनी विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीच्या समर्थनार्थ वाहन रॅली काढली. मात्र भूमिपूत्रांची मागील काही आंदोलने आणि आता निघालेली वाहन रॅली यात जामीन अस्मानाचा फरक जाणवतोय. वाहन रॅलीला जसा प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तसा प्रतिसाद मिळाला नाही. शहरी भाग आणि इतर जिल्ह्यातील गोष्ट सोडा पण नवी मुंबईतील सर्व गावातील भूमीपुत्रांनी तरी या वाहन रॅली मध्ये सहभाग घेतला असता तरी हजारोंची गर्दी सहज झाली असती. मात्र भूमिपुत्र आला नाही हे सत्य आहे ज्याची अनेक राजकीय अराजकीय कारणे असू शकतात. मात्र रॅलीला मिळालेला कमी प्रतिसाद म्हणजे दि. बा. पाटील यांच्या नावाला आता स्थानिकांचे समर्थन राहिले नाही असा संदेश वर पर्यंत पोहचविणे सहज शक्य आहे आणि त्यातून दिबांच्या नावाऐवजी दुसरं नांव का नको असा विचार होऊ शकतो.

*वाहन रॅली ते समारोप सभा, महायुतीच्या सर्व नेत्यांची पाठ*

नवी मुंबईतील वाशी येथून निघालेल्या वाहन रॅलीत सत्ताधारी महायुती मधील कोणताही मोठा स्थानिक नेता फिरकला देखील नाही. वाहन रॅली सोडा समारोप सभेला देखील कोणताही सत्ताधारी पक्षातील नेता आला नाही. दिबांच्या नावाच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीमध्ये त्यांच्या नावावर राजकारण करणारे मागील आंदोलनात पुढे पुढे करणारे सर्व नेते पाठ फिरवतायत, या नेत्यांना आता विमानतळाला दिबांचे नाव नाही मिळणार याची चुणूक तर लागली नाही ना अशी शंका मनात निर्माण होतेय.

एकूणच रात्र वैऱ्याची आहे झोपेचं सोंग घेऊन चालणार नाही एकदा का दुसरं नाव जाहीर झालं तर ते बदलणे अशक्य आहे. त्यामुळे विमानतळाला दिबांचेच नाव मिळायला हवे या मागणीसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरणे आवश्यक आहे. या नेत्यांशिवाय देखील भूमिपुत्र म्हणून सर्वांनी स्वखुशीने उतरायला हवे. नेते होते, नेते आहेत आणि नेते राहतील मात्र आपल्याला सत्तेच्या लोभापोटी स्वतःचा इमान विकणाऱ्यांच्या पाठीशी न राहता आपल्या भूमीवर उतरणाऱ्या प्रत्येक इमानाला आपल्या बापाचं नाव देण्यासाठी उभं राहायचंय त्यामुळे तयार रहा वेळ बंड करण्याची आहे थंड बसण्याची नाही.

सिद्धेश म्हात्रे
संपादक – नवी मुंबई मिरर
8898050148

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments